नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने शत्रू देशाच्या हद्दीत सुमारे १०० किलोमीटर आत जाऊन कारवाई केली आणि ९ दहशतवादी तळं उध्वस्त केलीत. यामध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. यासंदर्भात लोकसभेत सुरू असलेल्या चर्चे सहभागी होताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शहा म्हणाले की, “भारताने केवळ दहशतवाद्यांवर हल्ला केला, पण पाकिस्तानने तो स्वतःवर हल्ला मानला. त्यांच्या लष्कराने दहशतवाद्यांच्या जनाजाला खांदा दिला – हे जगाने पाहिले.”
विरोधी पक्षाने ‘संघर्षविरामावर प्रश्न उपस्थित करत विचारले की आपण जर चांगल्या स्थितीत होतो, तर युद्ध का केले नाही ? यावर उत्तर देताना शहा म्हणाले, “युद्धाचे अनेक परिणाम असतात, आणि ते विचारपूर्वक करावे लागते.” यावेळी शाह यांनी 1948 मधील युद्धाची आठवण करून दिली आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निर्णयामुळेच पीओके अस्तित्वात आल्याचा आरोप केला.तसेच त्यांनी सिंधू जल करार, हाजी पीरचा परतावा (1965) आणि 1971चा शिमला करार यांवरून काँग्रेसवर टीका केली.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने खालील दहशतवादी तळांवर कारवाई केली : बहावलपूर – मरकज शुभानअल्लाह, मुरीदके – मरकज तैयबा, सियालकोट – मेहमूना जोया कॅम्प, सरजल कॅम्प, मुजफ्फराबाद – सवाईनाला, सैयदना बिलाल कॅम्प, कोटली – गुलपूर अब्बास कॅम्प, भीमबर (बरनाला कॅम्प), शहा यांनी स्पष्ट केले की या कारवाईत कोणताही सामान्य नागरिक जखमी झाला नाही; फक्त दहशतवादीच लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानच्या हल्ल्यांविषयी माहिती देताना शहा म्हणाले: पाकिस्तानने भारताच्या काही लष्करी तळांवर हल्ले केले. भारताचा कोणताही लष्करी अपाय झाला नाही. एका गुरुद्वारा आणि मंदिराचे थोडेसे नुकसान झाले. काही सामान्य नागरिक जखमी झाले. एअरबेसवरील कारवाई: भारताने पाकिस्तानच्या ११ एअरबेसवर हल्ला केला, त्यापैकी ८ बेसला मोठे नुकसान झाले आहे. गृहमंत्र्यांनी हे देखील नमूद केले की, ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये राज्यपुरस्कृत दहशतवाद कसा चालतो आहे, याचा जागतिक पातळीवर भंडाफोड झाला.