मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत ईडीने तब्बल ३,०८४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली असून, यामध्ये मुंबईतील बांद्रा वेस्ट येथील पाली हिल भागातील अनिल अंबानी यांचा आलिशान बंगला देखील समाविष्ट आहे. ही कारवाई ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या चार वेगवेगळ्या आदेशांनुसार करण्यात आली आहे.
ईडीची ही कारवाई केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई (कांचीपुरमसह) आणि आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरीपर्यंत करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये कार्यालयीन इमारती, निवासी प्रॉपर्टीज आणि जमिनींचा समावेश आहे. ही कारवाई रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) या दोन कंपन्यांमार्फत सार्वजनिक निधी उभारून त्याचा गैरवापर झाल्याच्या आरोपांवरून करण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांशी संबंधित ४० हून अधिक मालमत्तांवर ईडीने तात्पुरती जप्त केली आहे.
तपासात असे समोर आले आहे की २०१७ ते २०१९ या काळात येस बँकेने आरएचएफएल मध्ये २,९६५ कोटी आणि आरसीएफएल मध्ये २,०४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. डिसेंबर २०१९ पर्यंत या गुंतवणुकी ‘नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स’ (एनपीए) ठरल्या. आरएचएफएल वर १,३५३.५० कोटी आणि आरसीएफएल वर १,९८४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ईडीने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांचाही तपास सुरू केला असून, या तपासात तब्बल १३,६०० कोटी रुपयांच्या कर्जघोटाळ्याचा उलगडा झाला आहे. यापैकी १२,६०० कोटी रुपये संबंधित कंपन्यांकडे वळवण्यात आले, तर उर्वरित १,८०० कोटी रुपये ठेवी आणि म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून इतर संस्थांकडे ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
अलीकडच्या काळात ईडीने अनिल अंबानी समूहावरील कारवाईचा वेग वाढवला होता. याआधी ५ ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांना कथित कर्ज फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. त्यापूर्वी जुलै महिन्यात रिलायन्स समूहाशी संबंधित मुंबईतील ३५ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते, ज्यामध्ये ५० व्यावसायिक संस्था आणि २५ व्यक्तींचा समावेश होता. ऑक्टोबरमध्ये ईडीने समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी अशोक कुमार पाल यांना बनावट बँक हमी प्रकरणात अटक केली होती.