घरगुती-सार्वजनिक मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग

0

मुंबई : यंदाच्या वर्षी राज्य सरकारने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला. त्यामुळे उत्सवाचा उत्साह आणखीनच द्विगुणीत झाला आहे. वर्षभर बालगोपाळांसह सर्वच जण आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात, असा हा गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने खुलल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी आकर्षक अशा पर्यावरणपूरक राजसिंहासन, मोर, अष्टविनायक मखराला ग्राहकांची पसंती असून लटकन, तोरण, गुलाबाचा पट्टा अशा सजावट साहित्यालाही मोठी मागणी आहे.

या आकर्षक आणि नवीनतम वस्तूंची जोरदार खरेदी सुरू असताना दुसरीकडे घरोघरी लहान मूर्तीच्या आगमनासाठी स्वच्छता, टापटीप, डेकोरेशन, नाविन्यपूर्ण मखरात विराजमान होण्यासाठी विविध रुपातील बाप्पांच्या मूर्तीही सजल्या आहेत. आता उद्या, मंगळवारी वाजत गाजत घरगुती गणपती स्थानापन्न होतील. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्ती तर आधीपासूनच मंडपात विराजमान झाल्या आहेत. आता केवळ भक्तांना सार्वजनिक दर्शनाची आतुरता लागली आहे.

मुंबईतील लालबागचा राजा, परळचा राजा, चिंतामणी, खेतवाडी, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समिती, अंधेरीचा राजा याशिवाय पुण्यातील मानाचे पाच गणपती – श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग गणपती, श्री केसरीवाडा गणपती यांसह राज्यभरात अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पांचे दर्शन आणि समाज उद्बोधक देखावे पाहण्यासाठी लांबून लांबून भक्त मुंबई, पुण्यात दाखल होतात.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, लालबाग, भुलेश्वर, लोहार चाळ, मस्जिद बंदर यांसह उपनगरातील बोरिवली, दहिसर, अंधेरी, घाटकोपर, मुलुंड आदी ठिकाणच्या बाजारपेठा गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून गर्दीने फुलू लागल्या आहेत. घरगुती गणेशमूर्ती मखराचे सजावट साहित्य ४०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. सध्या थर्माकॉल मखरांऐवजी इकोफ्रेंडली मखराला ग्राहकांची मागणी वाढत आहे. यावर्षी विठू माऊली, महालक्ष्मी देवी, शंकर, श्री स्वामी समर्थ, राज सिंहासन, मोर अशा रुपातील व राजमहल, राजमुद्रा, मोरपंख, बालाजी, गोल्डन टेम्पल अशा एक ना अनेक छोट्या व मोठ्या आकारांचे मखर बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech