उपचारासाठी आसाराम बापूंच्या अंतरिम जामिनात २९ ऑगस्टपर्यंत वाढ

0

जोधपूर : बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेप भोगत असलेल्या आसाराम बापूंना उपचारासाठी २९ ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन वाढवला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठासमोर आसाराम बापूंच्या वतीनं उपचारांसाठी अंतरिम जामीन वाढवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. आसाराम बापूंच्या वतीने वकील निशांत बोरा आणि वकील यशपाल सिंह राजपुरोहित यांनी बाजू मांडली. सरकारच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता दीपक चौधरी यांनी युक्तीवाद केला.

वकील यशपाल सिंह यांच्या मते, उच्च न्यायालयाने बापूंचा अंतरिम जामीन २९ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. मात्र उच्च न्यायालयाने अहमदाबाद सरकारी रुग्णालयातील तीन डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाला त्यांची तपासणी करून २७ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. वैद्यकीय पथकात २ हृदयरोग आणि १ न्यूरोलॉजी अशा तज्ञ डॉक्टरांचाही समावेश असावा. संपूर्ण तपासणी केल्यानंतर अहवाल उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे पाठवण्यात यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

लैंगिक छळाच्या आरोपाखाली आसारामबापू २०१३ पासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात कैदेत होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या दरम्यान गुजरातमध्ये लैंगिक छळाच्या आणखी एका प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली. दरम्यान तुरुंगातून बाहेर येण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. या वर्षी ७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधील प्रकरणात तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. तर राजस्थान उच्च न्यायालयानेही तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.

अंतरिम जामीन पूर्ण झाल्यानंतर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण केले. ७ एप्रिल २०२५ रोजी अंतरिम जामीन तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला. १ जुलैला अंतरिम जामीन पूर्ण झाल्यानंतर ते आत्मसमर्पण करणार होते, परंतु राजस्थान उच्च न्यायालयाने ९ जुलैपर्यंत अंतरिम जामीन वाढवला. गुजरात उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन एक महिन्यासाठी वाढवला. राजस्थान उच्च न्यायालयात ८ जुलैला सुनावणी झाल्यानंतर त्यांच्या उपचारांसाठी अंतरिम जामीन एक महिन्यानं म्हणजेच १२ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला. अंतरिम जामीन पूर्ण होण्यापूर्वी पुन्हा अर्ज केला. त्यामुळे न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत दिलासा दिला आहे. यावेळी अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयाकडून तपासणी केल्यानंतर अहवाल मागवण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech