मुंबई : आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. वारीत सहभागी होऊन विठ्ठल भक्तीत रममान होण्याचा मानस अनेकांचा असतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही वारीत चालण्याचा संकल्प केला आहे. मंगळवार २४ जून रोजी सपकाळ हे दिंडीत सहभागी होत असून ते दिवसभर दिंडीसोबत चालणार आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवत गावातून दिंडी क्रमांक २८२ मध्ये सकाळी ७ वाजता हर्षवर्धन सपकाळ सहभागी होतील व वरवंड गावापर्यंत पायी चालतील.
“पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या वारीत कोणताही जात, धर्म, पंथ न पहाता शेकडो वर्षांपासून हा विठ्ठल भक्तीचा प्रवास सुरु आहे. सर्वजण विठ्ठ्लाच्या ओढीने पंढरपूरकडे पायी चालत जातात. महाराष्ट्र धर्म जागवण्याचे काम या वारीच्या माध्यमातून होत आहे. सर्वसामान्य भक्तांचा सखा विठुराया अशी सावळ्या विठूची ख्याती आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा असंख्य संतांनी महाराष्ट्राला एक अध्यात्मिक वारसा घालून दिला आहे. पंढरपूरची वारी व संत परंपरा हीच भारताची खरी ओळख सांगणारा आहे. आज जातीपातीच्या, धर्माच्या नावावर समाजात दुही माजवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही परंपरा आहे. या वारी परंपरेचा वारसा आपल्याला जपला पाहिजे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेत एक दिवस तरी वारी अनुभवावी म्हणून दिंडीत सहभागी होऊया, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.