भुवनेश्वर : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दलाने (आयएएफ) काल ११, जुलै रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर सुखोई-३० एमके-I प्लॅटफॉर्मवरून स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) सीकरने सुसज्ज स्वदेशी बनावटीच्या दृष्टी टप्प्याच्या पलिकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर-टू-एअर (बीव्हीआरएएएम) ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. चाचण्यांदरम्यान, वेगवेगळे अंतर , लक्ष्य संबंधित पैलू आणि प्रक्षेपण प्लॅटफॉर्म परिस्थितीवर उच्च गतीच्या मानवरहित हवाई लक्ष्यांवर दोन प्रक्षेपणे करण्यात आली. दोन्ही प्रक्षेपणांमध्ये , क्षेपणास्त्रांनी अतिशय अचूकतेने लक्ष्ये नष्ट केली.
चाचण्यांदरम्यान, सर्व उपप्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली, ज्यामध्ये डीआरडीओच्या स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या आरएफ सीकरचा समावेश होता. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंज ने तैनात केलेल्या रेंज ट्रॅकिंग उपकरणांमधून प्राप्त डेटाद्वारे अस्त्र शस्त्रास्त्रे प्रणालीची निर्दोष कामगिरी सत्यापित करण्यात आली. या यशस्वी उड्डाण चाचण्यांमुळे स्वदेशी सीकरसह अस्त्र शस्त्रास्त्रे प्रणालीची अचूकता आणि विश्वसनीयता पुन्हा सिद्ध झाली आहे.
अस्त्र बीव्हीआरएएमची मारक क्षमता १०० किमीपेक्षा जास्त आहे आणि ती अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नेव्हिगेशन प्रणालीने सुसज्ज आहे. डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांव्यतिरिक्त, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसह ५० हून अधिक सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांनी या शस्त्रास्त्रे प्रणालीच्या यशस्वी निर्मितीत योगदान दिले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आरएफ सीकरच्या डिझाइन आणि विकासात सहभागी असलेल्या डीआरडीओ, हवाई दल आणि उद्योगांचे कौतुक केले आणि सांगितले की स्वदेशी सीकरसह क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही प्रमुख संरक्षण तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी यशस्वी चाचणीत सहभागी असलेल्या सर्व चमूचे अभिनंदन केले.