नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जनसुनावणी दरम्यान हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने त्यांचा हात ओढून त्यांना झापड मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी राजेश खीमजी (वय ३५, राजकोट, गुजरात) याला ताब्यात घेतले असून सध्या चौकशी सुरू आहे. हल्ल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवेदन जारी करण्यात आले असून, सुरक्षेचे बंदोबस्त वाढविण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी डीसीपी आणि स्पेशल सेल हजर झाले असून, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. घटनेच्या वेळी अनेक लोक जनसुनावणीसाठी उपस्थित होते. एका साक्षीदाराने सांगितले की, आरोपीने समस्या सांगण्याच्या बहाण्याने जवळ येत अचानक हल्ला केला. या झटापटीत सीएम गुप्ता यांच्या डोक्याला मेज किंवा खुर्चीच्या भागामुळे दुखापत झाली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एक महिला मुख्यमंत्री दररोज १८ तास काम करतात आणि नियमित जनसुनावणी घेते, त्यांच्यावर हल्ला होणे खेदजनक आहे. आरोपीकडून कागदांचे एक गाठोडे सापडले आहे. मुख्यमंत्री गुप्ता यांच्या डोक्याला देखील दुखापत झाल्याचे सांगत सचदेवा यांनी चिंता व्यक्त केलीय. भाजप आमदार हरीश खुराणा यांनी म्हणाले की, आरोपीने मुख्यमंत्र्यांचे केस ओढण्याचा आणि त्यांना झापड मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षेमधील हा हलगर्जीपणा गंभीर बाब आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे खुराणा यांनी सांगितले.