नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्याजवळ जाण्यापासून रोखल्याच्या रागातून एका इसमाने महिला वाहतूक पोलिसाला रस्त्यावरच मारहाण केली व तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी संध्याकाळी नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यासंदर्भातील माहितीनुसार नागपुरातील दहीबाजार पुलाजवळ सोमवारी ४ ऑगस्ट रोजी संध्याळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ताफा आझमशाह चौकातून शांतीनगरकडे जात होता. त्यामुळे त्या मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता, ताफा दहीबाजार पुलाजवळ पोहोचला, त्यावेळी दोन महिला वाहतूक पोलीस कर्मचारी ड्युटीवर होत्या आणि त्यांनी वाहतूक थांबवलेली होती. त्यावेळी शांतीनगरच्या कश्यप कॉलोनीत राहणारा सैय्यद सज्जाद मुजफ्फर अली हा इसम मालधक्क्याच्या दिशेने येऊन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. महिला पोलिसांनी त्याला रोखत, “व्हीआयपी ताफा जात आहे, थांबा,” असे सांगितले. यावरून संतप्त झालेल्या सैय्यदने तिला शिवीगाळ केली, नंतर धक्काबुक्की करत मारहाण केली.
ताफा निघून गेल्यानंतर, सैय्यदने महिला पोलिसाच्या अंगावरील शर्ट पकडून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने तिला ओढत ‘ब्रिज व्ह्यू हॉटेल’ पर्यंत नेले. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती, तरीही तो शिवीगाळ व मारहाण करतच राहिला.इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. काही नागरिकांनीही हस्तक्षेप करत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहताच सैय्यदने गर्दीचा फायदा घेत पलायन केले. उपस्थित नागरिकांनी त्याचे नाव पोलिसांना सांगितले. महिला पोलीस कर्मचाऱ्याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, काहीजण घटनास्थळीही पोहोचले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.