जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम

0

मुंबई : जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळामार्फत राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम राबविण्यात येत आहे. तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करत लोकांना नशा मुक्त जीवन जगण्याचे आवाहन या उपक्रमात करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. मुंबईतील केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय व सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांना तंबाखू व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सखोल माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमात तंबाखू, धूम्रपान, अल्कोहोल व ड्रग्सच्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. व्यसनमुक्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्रांची स्थापना, ‘मॅजिक जार’ संकल्पना, तसेच सतत तणावाखाली राहणाऱ्यांसाठी समुपदेशन सुविधा यांसारखे उपक्रम यावेळी राबविण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, तंबाखूमुळे केवळ कर्करोग होण्याची शक्यता वाढत नाही तर मेंदूच्या कार्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यातील निकोटीन हे रसायन शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्यांचे फुफ्फुस हे इतरांच्या तुलनेत कमी कार्यक्षम असते, तर अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे यकृताचे विकार उद्भवू शकतात.

या उपक्रमात व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, सलाम मुंबई फाउंडेशन यांसारख्या अनेक नशामुक्ती संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विविध सादरीकरणे व खेळांच्या माध्यमातून या संस्थांनी व्यसनमुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. तंबाखू विक्रीवरील कायदेशीर मर्यादा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शाळा, महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. राज्य नशाबंदी मंडळाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेला हा उपक्रम तंबाखूविरोधी लढ्यास नवे बळ देणारा ठरला असून, नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन स्वतःच्या आरोग्यासाठी तंबाखूला नकार द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech