पुणे : पुणे येथे सुरू असणारी बाल पुस्तक जत्रा हा अत्यंत या काळातील स्तुत्य उपक्रम असून पुढच्या वर्षी सांस्कृतिक विभाग ही या बालसाहित्य जत्रेत सहभागी होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी आज पुणे येथे केली. राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, संवाद आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्यातर्फे आयोजित “स्वर्गीय जयंत नारळीकर भवन” येथे पुणे बाल पुस्तक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. या जत्रेला राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी भेट दिली. पुस्तकांच्या स्टाँल ला भेट देऊन त्यांनी संपूर्ण जत्रेत फेरफटका मारला. विटीदांडूच्या खेळातही ते सहभागी झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार म्हणाले की, आज ए आय म्हणजे कृत्रिम प्रज्ञेचा जमाना आहे पण खरी प्रज्ञा ही पुस्तकात आहे. त्यामुळे आजच्या काळात ज्या जत्रेची आवश्यकता होती असा उपक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला. आम्ही सांस्कृतिक विभागातर्फे लोककला, लोकवाद्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा, तसेच नाटक आणि या सगळ्या कला प्रकारातून संस्कृती आणि प्रज्ञेचे जतन संवर्धन करीत आहोत त्यामुळे या चांगल्या उपक्रमात पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्य विभाग ही सहभागी होईल, असेहि त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला आयोजक राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, सुनील महाजन, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.