बाराबंकी अवसानेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी : दोन ठार, अनेक जखमी

0

मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केला शोक

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी(दि.२८) हैदरगड परिसरातील प्राचीन अवसानेश्वर महादेव मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली. मंदिरात रात्री १२ नंतर जलाभिषेक सुरू झाला होता. या जलाभिषेक दरम्यान विजेचा एक तारा तुटून मंदिराच्या परिसरातील टिनशेडवर पडला, ज्यामुळे विद्युत प्रवाह पसरला आणि त्यामुळे गर्दीत गोंधळ, आरडाओरड सुरू झाली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर २९ जण जखमी झाले आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकीतील अवसानेश्वर मंदिरात विजेच्या तारा तुटून घडलेल्या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या दोन भाविकांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य गतीमान करण्याचे तसेच दीड डझनहून अधिक जखमी भाविकांना त्वरित रुग्णालयात नेऊन योग्य उपचाराची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या अपघातात लोनीकटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुबारकपुरा गावातील प्रशांत (२२) आणि एक अन्य भाविक यांचा त्रिवेदीगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत सुमारे २९ ते ३८ भाविक जखमी झाले असून त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. त्रिवेदीगंज सीएचसीमध्ये १० जखमींना भरती करण्यात आले असून त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर हैदरगड सीएचसीमध्ये २६ जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यातील एका जखमीला गंभीर अवस्थेमुळे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी सांगितले की ही घटना पहाटे सुमारे २ वाजता घडली, जेव्हा मोठ्या संख्येने भाविक जलाभिषेकासाठी मंदिरात उपस्थित होते. एका माकडाने विजेच्या तारांवर उडी मारल्याने तार तुटून टिनशेडवर पडली आणि त्यामुळे विद्युत प्रवाह पसरला. यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि भगदड माजली.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी, पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय आणि अन्य प्रशासनिक अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि जखमींना लगेच अँब्युलन्सद्वारे हैदरगड आणि त्रिवेदीगंज सीएचसी येथे हलवण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून विजेच्या जुन्या तारांची स्थिती तपासण्याचे आदेश विद्युत विभागाला देण्यात आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech