बेळगाव येथे सरकारी शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी तिघांना अटक

0

बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथील जनता सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सागर सक्रेप्पा पाटील (२९), नागनगौडा बसाप्पा पाटील (२५), कृष्णा यमनाप्पा मादर (२६,) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिस अधीक्षक गुळेद यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी हुलीकट्टी येथील जनता सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या शाळेत ४१ विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

बेळगाव पोलिसांनी या विषबाधेचा सखोल तपास सुरू केला होता. हुलीकट्टी प्राथमिक शाळेत सुलेमान घोरी नायक हे १३ वर्षांपासून कार्यरत असून, सध्या ते मुख्याध्यापक आहेत. ते आपल्या गावातील शाळेत मुख्याध्यापक नको, असे संघटनेचा तालुकाध्यक्ष सागर पाटील याला वाटत होते. शाळेतील विद्यार्थी काही कारणामुळे मृत पावले तर याचा ठपका मुख्याध्यापकावर येईल व त्याची बदली करता येईल, असा विचार करून त्यांनी कट रचला होता.

टाकीत विष मिसळल्याच्या दिवशी नागनगौडा व कृष्णा या दोघांनी मुनवळ्ळीला जाऊन खतविक्रीच्या दुकानातून कीटकनाशक आणले. शाळेतीलच एका मुलाला चॉकलेट व ५०० रुपयांच्या नोटेचे आमिष दाखवून त्याला कीटकनाशकाची बाटली पाण्याच्या टाकीत ओतण्यास सांगितल्याचे गुळेद यांनी सांगितले. त्यानुसार त्या विद्यार्थ्याने बाटली शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ओतली. टाकीतील पाणी विद्यार्थ्यांनी प्यायल्यानंतर त्यांच्या पोटात दुखणे, उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. घटनेची सखोल चौकशी करताना हा प्रकार उघडकीस आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech