बंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ ४ जून रोजी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयी मिरवणूकी दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तीन महिन्यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीने एक भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने आरसीबीच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की, ४ जून हा आमच्या फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण असायला हवा होता. पण तो एका दुःखद क्षणात बदलला. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि जखमी झालेल्या चाहत्यांसाठी मी प्रार्थना करत आहे. त्यांने सांगितले की, आम्ही सावधगिरीने, आदराने आणि जबाबदारीने पुढे जाऊ.
आयपीएलमध्ये आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान, स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी जमली असताना चेंगराचेंगरीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी आरसीबी, केएससीए आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंटविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. राज्य सरकारने शहराचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह काही अधिकाऱ्यांना निलंबितही केले होते.