बिहारमध्ये निवडणूक बिगुल वाजला

0

निवडणूक आयोगाकडून तारीखांची घोषणा, आगामी ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज, सोमवारी निवडणूक आयोगाने तारीखांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, बिहार विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी समाप्त होत आहे. अनेक राजकीय पक्षांनी छठ महापर्वानंतर लगेच निवडणूक घेण्याची मागणी केली होती, जेणेकरून नागरिक मोठ्या संख्येने मतदान करू शकतील. बिहारमधील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये २ टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर केला जाईल निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्या असून, निवडणुकीदरम्यान हिंसा अजिबात सहन केली जाणार नाही. तसेच खोट्या बातम्यांवर (फेक न्यूज) देखील कठोर नजर ठेवण्यात येईल असे ज्ञानेशकुमार यांनी सांगितले.

बिहारमधील मतदारांची संख्या
मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एकूण सुमारे ७.४३ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ३.९२ कोटी पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १७२५ इतकी आहे. तसेच दिव्यांग मतदार ७.२ लाख असून ४.०४ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याचप्रमाण १४ हजार मतदार वय १०० वर्षांहून अधिक असून सुमारे १४ लाख प्रथमच मतदार होणारे युवक आहेत. यापूर्वी २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुका ३ टप्प्यांत पार पडल्या होत्या. त्यावेळी २८ ऑक्टोबर २०२० रोजी ७१ जागांवर, ३ नोव्हेंबर रोजी ९४ आणि ०७ नोव्हेंबर रोजी ७८ जागांवर मतदान झाले होते. तर मतमोजणी १० नोव्हेंबर २०२० रोजी झाली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech