पाटणा : बिहारच्या कनेक्टिव्हिटीला नवीन गती देणारा औंटा ते सिमरिया महासेतू आता पूर्णपणे तयार झाला आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौर्यावर येणार असून याच दिवशी या आधुनिक महासेतूचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मोकामा येथील औंट घाट आणि बेगूसरायच्या सिमरियाला जोडणारा हा ६ लेनचा पूल आता विकसित होत असलेल्या बिहारचे प्रतीक ठरणार आहे. हा नवीन पूल केवळ अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठीच उपयुक्त ठरणार नाही, तर पूर्वोत्तर राज्यांशी संपर्क साधण्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा लाभ केवळ बेगूसराय आणि आजूबाजूच्या भागांनाच नाही तर संपूर्ण बिहार आणि देशालाही होणार आहे.
या पुलाच्या सुरू होण्यामुळे उद्योगधंदे आणि व्यापाराला चालना मिळेल आणि पूर्वोत्तर भारताशी असलेली जोडणी अधिक बळकट होईल. या प्रकल्पाची एकूण किंमत १८७१ कोटी रुपये आहे. गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाची लांबी १.८६५ किलोमीटर आहे, तर अॅप्रोच रोडसह एकूण लांबी ८.१५० किलोमीटर इतकी आहे. या पुलाच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण बिहारमधील कनेक्टिव्हिटीमध्ये ऐतिहासिक बदल होणार आहे.
आत्तापर्यंत मोकामा-सिमरिया दरम्यान फक्त एकच २ लेनचा रेल्वे-सह-रस्ता पूल, म्हणजेच राजेंद्र सेतू होता. या पुलाचे उद्घाटन १९५९ मध्ये श्रीकृष्ण सिंह यांच्या शासनकाळात झाले होते. कालांतराने या पुलावर वाहतुकीचा ताण खूपच वाढला होता. त्यामुळे जलद कनेक्टिव्हिटीसाठी एका मोठ्या प्रकल्पाची गरज खूप काळापासून जाणवत होती. आता सुमारे ८ किमी लांबीचा ६ लेनचा हा नवा पूल तयार झाला असून तो २२ ऑगस्ट रोजी जनतेस अर्पण केला जाणार आहे.
या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे १० वर्षे लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये बिहारसाठी विशेष पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेज अंतर्गतच या ६ लेनच्या महासेतूचे बांधकाम करण्यात आले आहे. २०१७ मध्ये मोकामामध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी या सेतूची पायाभरणी केली होती. आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.
याशिवाय रस्ता कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी २२ ऑगस्ट रोजीच बख्तियारपूर ते मोकामा जाणाऱ्या ४ लेन रस्त्याचाही उद्घाटन होणार आहे. ४४.६० किमी लांबीच्या या रस्त्याची एकूण किंमत १८९९ कोटी रुपये आहे. पटना ते बख्तियारपूरपर्यंतचा ४ लेन रस्ता यापूर्वीच तयार झाला आहे आणि सिमरिया ते खगडिया दरम्यानचा रस्ताही विस्तारीत केला गेला आहे. पुढे खगडिया ते पूर्णिया दरम्यान ४ लेन रस्त्याचे कामही सध्या सुरू आहे.