भाजपाने आमदार टी. राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला

0

हैदराबाद : तेलंगाणामधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार टी. राजा सिंह यांनी प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान आता भाजप पक्ष नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आमदार राजा सिंह यांनी एन. रामचंदर राव यांना भाजपाचे तेलंगाणामधील प्रदेशाध्यक्ष बनवल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी पक्ष नेतृत्वावर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि चुकीचे नेतृत्व निवडल्याचा आरोप केला होता. मात्र हिंदुत्वाच्या विचारसरणीशी आपली कटीबद्धता कायम राहील, अशी भावना व्यक्त केली होती.

टी. राजा सिंह यांना हैदराबादमध्ये टायगर राजा सिंह या नावाने ओळखले जातात. राजा सिंह हे २०१४, २०१८ आणि २०२३ असे सलग तीन वेळा हैदराबाद शहरातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गोशामहल विधानसभा मतदारसंघ ओवेसींच्या एमआयएमचं वर्चस्व असलेल्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात येतो. मात्र गोशामहल भागात राजा सिंह यांनी आपलं वर्चस्व राखलेले आहे. अगदी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपाचे बहुतांश उमेदवार पराभूत झाले होते, तेव्हाही राजा सिंह मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

राजा सिंह यांची कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख आहे. तसेच गोरक्षण आणि हिंदू समाजाच्या ऐक्यावर ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात. राजा सिंह हे बजरंग दल आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्ववादी संघटनांशी जोडलेले आहेत. आता भाजपाने राजीनामा स्वीकारल्यानंतर राजा सिंह यांनी पुढील वाटचाल कशी राहील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech