नवी दिल्ली : राज ठाकरे मराठी संस्कृतीचा अनादर करत आहेत. या देशाची आणि महाराष्ट्राची जी प्रांतीय एकात्मता आहे, जे भाषिक ऐक्य आहे, बंधूभाव आहे, ते तोडण्याचा प्रयत्न करणारा हा प्राणी आहे. त्यामुळे राज ठाकरेंना ज्याला जे बोलायचे आहे ते बोलावे; पण, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, जो व्यक्ती राजकारणाच्या कचराकुंडीत गेला आहे, त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होऊ नये अशी मी प्रार्थना करतो, असे विधान भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
तिवारी पुढे म्हणाले की, मराठी भाषा, मराठी अस्मिता यांचे सर्वाधिक पालन भाजपाकडून केले जाते. मराठी संस्कृतीचा आदर जसा भाजपाकडून केला जातो, तसा कुणी करत नाही आणि करूही शकत नाही. परंतु या उलट जे राज ठाकरेंसोबत जातील, तेही राजकारणातून नष्ट होतील. कारण या महाराष्ट्रातील लोक, मराठी भाषेचे पालन योग्य पद्धतीने करत आहेत. राज ठाकरे यांच्या इतका कोणताही मराठी माणूस संस्कृतीचा अनादर करू शकत नाही. पण मराठी संस्कृतीचा अनादर करणाऱ्यांमध्ये राज ठाकरे देखील आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची जनता कुठेही उभं करणार नाही. राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने दुर्लक्षित केले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी वाद पेटला आहे. अशातच राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा इशारा देताच राज्य सरकारने हिंदी सक्तीची निर्णय मागे घेतला. त्यानंतर राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपा खासदार निशिकांत दुबे हे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंवर टीका करत होते. यातच आता भाजपा खासदार मनोज तिवारी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.