पाटणा : बिहारमधील प्रसिद्ध उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाजप-नितीश कुमार यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “नितीश कुमार आणि भाजपा यांच्या आघाडीच्या सरकारने बिहारला भारताची क्राइम कॅपिटल बनवले आहे.” याआधीही राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनी गोपाल खेमका यांच्या हत्येवरून सरकारवर हल्ला चढवत बिहारमध्ये जंगलराज असल्याचा आरोप केला होता.
राहुल गांधी पुढे म्हणाले, “आज बिहार लूट, गोळीबार आणि हत्यांच्या सावटाखाली जगत आहे. इथे गुन्हेगारी सामान्य झाली आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे. बिहारच्या बंधू-भगिनींनो, हा अन्याय आपण आता अधिक काळ सहन करू शकत नाही. जे सरकार तुमच्या मुलांच्या सुरक्षेची हमी देऊ शकत नाही, ती तुमच्या भविष्याची जबाबदारी कशी घेणार?” त्यांनी पुढे लिहिले, “प्रत्येक हत्या, प्रत्येक लूटमार, प्रत्येक गोळी ही बदलाची हाक आहे. आता वेळ आली आहे नव्या बिहारची — जिथे भीती नाही, तर प्रगती आहे. यावेळी मत हे फक्त सरकार बदलण्यासाठी नव्हे, तर बिहार वाचवण्यासाठी असले पाहिजे.”
पटनामध्ये गोपाल खेमका यांची निर्घृण हत्या : शुक्रवारच्या रात्री, पाटण्यातील गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते पाटणातील एक प्रसिद्ध आणि मोठे उद्योजक होते. विशेष म्हणजे, सहा वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा गुंजन खेमका याचीही वैशालीमधील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या झाली होती. पाटणाच्या पॉश भागात खुलेआम घडलेली ही हत्या केवळ धक्कादायक नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारसाठीही डोकेदुखी ठरू शकते. ही घटना विरोधकांसाठी एक मोठा मुद्दा बनली आहे.
गोपाल खेमका यांचा व्यवसायिक वर्तुळात मोठा प्रभाव होता. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण व्यापारी वर्ग हादरून गेला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी देखील या घटनेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “पोलीस ठाण्यापासून काही पावले दूर असलेल्या ठिकाणी बिहारमधील मोठ्या व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली जाते. दर महिन्याला बिहारमध्ये शेकडो व्यापाऱ्यांच्या हत्या होत आहेत. तरीही आपण याला जंगलराज म्हणणार नाही? कारण यालाच शास्त्रांमध्ये ‘मीडिया मॅनेजमेंट’, ‘परसेप्शन मॅनेजमेंट’ आणि ‘इमेज मॅनेजमेंट’ म्हणतात.” गोपाल खेमका यांची हत्या केवळ एक गुन्हा नसून, बिहारच्या राजकीय व सामाजिक वास्तवावर मोठा प्रश्न उभा करणारी घटना आहे. विरोधकांनी या घटनेला मुद्दा बनवत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.