मुंबई : नवीन भूमिकेसाठी बॉबी देओलने १५ किलो वजन घटवलं आहे. त्याने फक्त वजनच कमी केलं नाही, तर दाढी-मिशा आणि केस वाढवून संपूर्ण लुकच बदलला आहे. या चित्रपटात तो अशा अवतारात दिसणार आहे, ज्यात प्रेक्षकांनी त्याला याआधी कधीच पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याचा हा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सध्या बॉबी देओलची बहुप्रतिक्षित फिल्म ‘हरि हर वीरा मल्लू’ २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही एक पीरियड अॅक्शन ड्रामा फिल्म असून, दिग्दर्शक कृष जगरलामुदी आणि ए.एम. ज्योति कृष्णा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यात साउथ सुपरस्टार पवन कल्याण सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
यासोबतच बॉबी देओलकडे आणखी एक मोठा प्रोजेक्ट आहे – ‘अल्फा’. या अॅक्शन-पॅक्ड चित्रपटात तो आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘अल्फा’ हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाकडेदेखील प्रेक्षकांचे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष लागले आहे. बॉबी देओलचा हा ट्रान्सफॉर्मेशन आणि दमदार लुक पाहून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. आता त्याच्या नव्या अंदाजात तो प्रेक्षकांच्या मनात काय ठसा उमटवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.