शिर्डी : लाखो, करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही माहिती मिळताच पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संदर्भात साई मंदिर ट्रस्टने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागवत मान नावाच्या व्यक्तीने शिर्डी साई बाबा मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ई-मेल आयडीवरून उघड झाले आहे. ईमेल मिळाल्यानंतर लगेचच शिर्डी साई बाबा मंदिर ट्रस्टने स्थानिक शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा धमकीचा ईमेल bhagvanthmann@yandex.com वरून आला आहे. त्यात म्हटले आहे की, साई मंदिर समाधी स्थळ आणि द्वारका माई येथे बॉम्ब ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
यापूर्वीही शिर्डी साई मंदिराला बॉम्बस्फोटाची धमकी आली आहे. दोन महिन्यांपूर्वी मे महिन्यात ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतरही ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर साई मंदिर आणि येणाऱ्या भक्तांची सुरक्षा वाढवण्यात आली. सुरक्षा लक्षात घेऊन दर्शनासाठी रांगेच्या प्रवेशद्वारावर तपासणी सुरू करण्यात आली. त्यानंतर शिर्डी साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याचा हा धमकीचा ईमेल आला. हा ईमेल अजित जोकामुल्ला नावाच्या ईमेल आयडीवरून आला होता. शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जातो. दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारावर साई बाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पुरुष आणि महिला दोघांचीही कडक तपासणी केली जाते.