बंगळुरू : हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) एक भीषण अपघात घडला आहे. कर्नूल जिल्ह्यातील कल्लूर मंडलातील चिन्नाटेकुर परिसरात एका बसला आग लागली, ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, आता आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, या अपघातात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. कालेश्वरम ट्रॅव्हल्सची बस बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर एका दुचाकीला धडकली आणि त्यानंतर बसला अचानक भीषण आग लागली. पोलिसांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी बसमध्ये चालक आणि सहाय्यकासह एकूण ४२ प्रवासी होते. आतापर्यंत १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मृतांमध्ये एका दुचाकीस्वाराचा समावेश असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. एसपी विक्रांत पाटील यांनी सांगितले की, या दुर्घटनेत २० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या लोकांचा उपचार सुरू आहे.
या अपघातातून सुमारे १९ प्रवासी, दोन मुले आणि दोन चालक थोडक्यात बचावले, असे कुर्नूल रेंजचे डीआयजी कोया प्रवीण यांनी सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत लिहिले,“कर्नूल जिल्ह्यातील चिन्नेटेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताबद्दल ऐकून मी स्तब्ध झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे, त्या सर्व कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. जखमी आणि प्रभावित कुटुंबांना शासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल.”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले, “आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे बसला लागलेल्या आगीत झालेली जीवितहानी अतिशय दुर्दैवी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते आणि जखमींच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारासाठी प्रार्थना करते.”