नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राविरोधात विशेष तपास पथकाने (एसआयटी) आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र सुमारे २५०० पानांचे आहे. या आरोपपत्रात पोलिसांनी असा दावा केला आहे की, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी एजंटांच्या हातून वापरली गेली आणि तिने संवेदनशील माहिती गुप्तपणे लीक केली. हरियाणा पोलिसांच्या सूत्रांनुसार, एसआयटीने असा दावा केला आहे की ज्योती पाकिस्तानसाठी “टूल किट” म्हणून वापरली जात होती. ती पाकिस्तानी एजंटांशी सातत्याने संपर्कात होती आणि त्यांच्यासोबत माहिती शेअर करत होती.ज्योती पाकिस्तान दौऱ्यावर असताना ती तिथल्या एजंटांच्या संपर्कात आली होती. तिच्या मोबाइल फोनमधून पोलिसांना अनेक महत्वाची माहिती मिळाली आहे. आरोपपत्रात असा दावाही करण्यात आला आहे की, ज्योती पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या दानिश अली याच्याशीही सातत्याने संपर्कात होती.
पोलिसांना ज्योती आणि दानिश यांच्यातील चॅट्स सुद्धा सापडले आहेत. तसेच ज्योतीची ISI एजंट शाकिर, हसन अली आणि नासिर ढिल्लों यांच्याशीही संभाषणे झाल्याचे समोर आले आहे. ज्योती आणि हसन नावाच्या एजंटमधील चॅट्सही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ज्योतीने केलेल्या सर्व परदेश दौऱ्यांचा उल्लेखही केस डायरीमध्ये करण्यात आला आहे. ज्योतीला १६ मे रोजी पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती न्यायिक कोठडीत आहे. या प्रकरणात हरियाणा पोलिसांनी अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही समन्स पाठवून चौकशी केली होती.