छत्तीसगड : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी(दि.१२) २३ कट्टर नक्षलवाद्यांनी एकत्रितपणे आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांवर १.१८ कोटी रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये तीन जोडप्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या २३ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये ११ वरिष्ठ कॅडर आहेत, यापैकी बहुतेक पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी बटालियन क्रमांक १ मध्ये सक्रिय आहेत. ही माओवाद्यांची सर्वात मजबूत लष्करी संघटना मानली जाते.पोकळ माओवादी विचारसरणी, नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेले अत्याचार आणि बंदी घातलेल्या संघटनेतील वाढत्या अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमधील लोकेश उर्फ पोडियाम भीमा (३५), रमेश उर्फ कलमू केसा (२३), कावासी मासा (३५), मडकम हुंगा (२३), नुप्पो गंगी (२८), पुनम देवे (३०), पारस्की पांडे (२२), मडवी जोगा (२०), नुप्पो लचू (२५), सुखाराम दुही (२५) या सगळ्यांवर बक्षीस जाहीर केले होते. प्रत्येकावर आठ लाख रुपयांचे बक्षीस होते. याशिवाय अन्य चार नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 5 लाख, एका नक्षलवाद्यावर 3 लाख आणि सात नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, “लोकेश हा विभागीय समिती सदस्य होता आणि इतर आठ जण माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन क्रमांक १ चे सदस्य होते. या घडामोडीवरून असे दिसून येते की सुकमा-बिजापूर आंतरजिल्हा सीमेवर सुरक्षा दलांच्या नक्षलविरोधी कारवायांच्या तीव्रतेमुळे बटालियन कमकुवत होत चालली आहे.