नवी दिल्ली : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारायला गेले. तेथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे प्रकरण घडले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांना अज्ञात व्यक्तींनी धमकीचे फोन येत असल्याची माहिती स्वतः तटकरेंनी पत्रकारांना सांगितली आहे.
सुनील तटकरेंनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक पद्धतीने निवेदन द्यायला आले होते. मी शांततेने व संयम राखत त्यांचे निवेदन स्वीकारले. मात्र त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तर काहीजणांनी मी जिथे दिसेन तिथे मारहाण केली जाईल, अशा प्रकारची वक्तव्ये केली आहेत. या घटनेनंतर मला अनेक धमकीचे फोन आले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. मी लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संयम राखणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते पाळले आहे.”
तटकरे यांनी स्पष्ट केले की, “मी सरकारमध्ये नाही, तर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. सरकारी यंत्रणेतील कामकाजाचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. ते सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत.” या संपूर्ण घटनेनंतर वाढलेला तणाव लक्षात घेता तटकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “सर्व संबंधितांशी चर्चा करून योग्य तो समन्वय साधला जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.