मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांना बोलावून उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सजीव ओ. पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, राज्यकर, वस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्मा, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, मित्राचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल तसेच, मित्राचे अर्थ तज्ज्ञ संजीव सक्सेना, मुंबई स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे प्राध्यापक सत्यनारायण कोठे आणि अर्थतज्ञ ऋषी शाह यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.
या बैठकीत जीडीपी, रोजगार, वाणिज्य आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर संभाव्य परिणाम, तसेच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील उद्योगांचे हित आणि अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीने समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. या अनुषंगाने केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील उद्योगांचे हित जोपासण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीच्या अखेरीस सांगितले.