राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार- उद्धव ठाकरेंना केला फोन

0

मुंबई : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोघांना सांगितले की राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा. याआधीही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना आवाहन केले होते की, त्यांनी महाराष्ट्राच्या विद्यमान राज्यपालांना पाठिंबा द्यावा. आता त्यांनी थेट फोन करून पाठिंब्याची विनंती केली आहे.

विरोधकांनी जेव्हा सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार घोषित केले, तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू संजय राऊत तेथे उपस्थित होते. या उपस्थितीनं विरोधकांमध्ये एकजुटीचा स्पष्ट संदेश दिला. गुरुवारी (21 ऑगस्ट) विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन दाखल केलं. यावेळी शरद पवार आणि संजय राऊत उपस्थित होते.

बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नामांकनानंतर शरद पवार म्हणाले,“ही निवडणूक केवळ एका व्यक्तीची नाही, तर आपल्या संविधान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण व त्यांच्या बळकटीकरणासाठीची निवडणूक आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, न्यायमूर्ती रेड्डी – जे नेहमीच न्याय, समानता आणि मानवाधिकारांसाठी ठाम उभे राहिले – उपराष्ट्रपती म्हणून या मूल्यांचे जतन करतील आणि त्यांना अधिक सशक्त करतील.” शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचा समावेश महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत तसेच राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीत आहे.

नामांकनावेळी संजय राऊत म्हणाले, “आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. संसद भवनातील निवडणूक कार्यालयात विरोधकांनी एकतेचं प्रदर्शन केलं!” आगामी ९ सप्टेंबर रोजी सी. पी. राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. संख्याबळाच्या दृष्टीने एनडीएचं पारडं जड मानलं जात आहे. विजय मिळवण्यासाठी ३९२ मतांची गरज आहे, आणि एनडीएकडे ४२२ मते आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech