मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी चित्रपट ‘अरण्य’च्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारी प्रभावी कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ‘अरण्य’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांत येणार आहे. सामान्य कुटुंबातील एका बापाची आणि त्याच्या मुलीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात एका नक्षलवाद्याच्या आयुष्यातील मानवी पैलू आणि त्याचे आपल्या लहान मुलीशी असलेले नाते प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
एस. एस. स्टुडिओ निर्मित आणि एक्सपो प्रेसेंट या चित्रपटाची निर्मिती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केली असून, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे फेम हार्दिक जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत हिृतीका पाटील, वीणा जगताप, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, अमोल खापरे आणि चेतन चावडा यांच्याही भूमिका आहेत. आदिवासी लोककलेवर आधारित संगीत या चित्रपटाची खासियत असून, प्रेक्षकांना अस्सलपणा सोबत सिनेमॅटिक अनुभव देखील देईल.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा अशा लोकांचा प्रवास दाखवतो, ज्यांनी हिंसेऐवजी शिक्षण आणि शांततेचा मार्ग स्वीकारला. हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल, असा मला विश्वास आहे. यांची ‘एक तिकीट, एक वृक्ष ‘ लावायची ही संकल्पना मला विशेष भावली.” चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी सांगितले, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चे पोस्टर अनावरण होणे हा आमच्या टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील सिनेमापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मनापासून केलेला प्रयत्न आहे.”