काँग्रेसने पवित्र भगवा आणि हिंदू शब्दाची बदनामी केली – समीर कुलकर्णी

0

अटकेच्या वेळी घेतलेले ९०० रुपये परत करण्याची आग्रही मागणी

मुंबई : विशेष एनआयए न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांना आनंद झाला आहे. हा खटला एक राजकीय कट होता, ज्याचा उद्देश देशभक्त आणि धार्मिक व्यक्तींची प्रतिमा मलिन करणे होता. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी भगव्या झेंड्याची बदनामी करण्याचा कट रचला होता. ही चौकशी तत्कालीन सरकारच्या दबावाखाली करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशभक्त, धार्मिक लोक आणि संतांना दहशतवादी म्हटले गेले. काँग्रेसने आमच्या श्रद्धेचे प्रतीक, पवित्र भगवा आणि हिंदू शब्द यांची जागतिक स्तरावर बदनामी केली, असा थेट आरोप निर्दोष सुटका झालेल्या समीर कुलकर्णी यांनी केला आहे.

समीर कुलकर्णी पुढे म्हणाले की, गेल्या १७ वर्षांपासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. भारताच्या स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास होता की, ते आमचे निर्दोषत्व सिद्ध करेल. पहिल्या दिवसापासून आम्हाला जे सत्य माहित होते, जे तत्कालीन यूपीए सरकार आणि तपास यंत्रणेला माहित होते, तेच सत्य आहे. आज संपूर्ण जगाला ते कळेल. खरे तर या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी शरद पवार, दिग्विजय सिंह, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील, शकील अहमद पटेल, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच आहेत, ज्यांनी २००९ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन हे कट रचले.

एनआयएच्या विशेष न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. निर्णयानंतर समीर कुलकर्णी यांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे की, ‘मला भोपाळमध्ये अटक करण्यात आली तेव्हा माझ्याकडून ९०० रुपये घेण्यात आले होते आणि ७५० रुपये रेकॉर्डमध्ये दाखवण्यात आले होते. ते ९०० रुपये मला परत मिळावेत. प्रश्न पैशांचा नाही’ समीर कुलकर्णी यांच्या मागणीवर न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही मौल्यवान वस्तू परत करण्याचा न्यायालयाचा आदेश नाही. कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे, तरी ते आपल्या पैशाच्या मागणीवर ठाम आहेत.

१७ वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे एक स्फोट झाला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. लोक नमाज पठणासाठी जात असताना हा बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात एनआयएने दहशतवादी कट रचणे, खून करणे, धार्मिक उन्माद पसरवणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. यासोबतच सात जणांना अटक करण्यात आली होती. नंतर अटक केलेल्यांची संख्या १४ झाली आहे. अटक केलेल्यांना सुमारे आठ वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते. २०१७ मध्ये सर्व आरोपींना जामीन मिळाला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech