शशी थरूर यांच्या घराणेशाही राजकारणावरील विधानामुळे काँग्रेस नाराज

0

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आपल्या एका लेखात भारतातील घराणेशाही राजकारणाविषयी केलेल्या वक्तव्यावरून आता प्रचंड वाद निर्माण झाला आहे. शशी थरूर यांनी आपल्या लेखात नेहरू-गांधी कुटुंबाचे नाव घेत वंशवादी राजकारणाचा आरोप केला. यावर आता काँग्रेस पक्ष बचावाच्या भूमिकेत गेला असून, दुसरीकडे भाजपला राहुल गांधी तसेच काँग्रेसवर टीका करण्याची संधी हाती आली आहे. शशी थरूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, “पंडित जवाहरलाल नेहरू हे या देशाचे सर्वात सक्षम पंतप्रधान होते. इंदिरा गांधी यांनी आपले जीवन बलिदान देऊन स्वतःला सिद्ध केले. राजीव गांधी यांनीही बलिदान देऊन देशसेवा केली. अशा वेळी जर कोणी गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करत असेल, तर देशात अजून कोणत्या कुटुंबाने असे बलिदान, समर्पण आणि क्षमता दाखवली आहे? काय ते भाजप आहे?”

काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी म्हटले की, एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्याला राजकारणात येण्यापासून रोखता येत नाही. ते म्हणाले, “लोकशाहीत शेवटचा निर्णय जनता घेते. तुम्ही एखाद्याला केवळ त्याचे वडील खासदार होते म्हणून राजकारणात येण्यापासून थांबवू शकत नाही. हे सर्व क्षेत्रांत घडत आहे. यापासून वाचण्यासाठी तुम्ही कोणता मार्ग शोधणार ?” काँग्रेस नेते उदित राज यांनीही गांधी कुटुंबाच्या वंशवादी राजकारणाचे समर्थन करत म्हटले की, “डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो, व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी बनतो, तर राजकारणही त्याला अपवाद नाही. जर एखाद्या राजकारण्याचा गुन्हेगारी इतिहास असेल, तर ते आपल्या समाजाचे वास्तव दाखवते. निवडणूक तिकीट जात आणि कुटुंबाच्या आधारावर वाटले जातात.” त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही घराणेशाही राजकारणाला चालना दिल्याचा आरोप केला.

दरम्यान, सत्ताधारी भाजप पक्षाने थरूर यांच्या विधानावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्ते शहजाद जयहिंद यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “शशी थरूर यांनी भारतातील नेपो किड राहुल गांधी आणि छोट्या नेपो किड तेजस्वी यादव यांच्यावर थेट हल्ला केला आहे. डॉ. थरूर आता खतरों के खिलाड़ी झाले आहेत! त्यांनी घराणेशाहीच्या नवाबावर थेट प्रहार केला आहे. मी जेव्हा २०१७ मध्ये नेपो नामदार राहुल गांधीविरुद्ध बोललो होतो, तेव्हा माझ्यासोबत काय घडले, ते तुम्हाला माहीत आहे. सर, तुमच्यासाठी प्रार्थना करतो, कारण ‘फर्स्ट फॅमिली’ बदला घेतल्याशिवाय राहत नाही.”

थरूर यांनी आपल्या “इंडियन पॉलिटिक्स आर अ फॅमिली बिझनेस ” या लेखात लिहिले आहे की, “नेहरू-गांधी कुटुंब हा भारतातील सर्वात प्रभावशाली राजकीय परिवार आहे आणि त्यांची परंपरा स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेली आहे. पण त्यामुळे काही लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली आहे की राजकारण हे काही विशिष्ट घराण्यांचे जन्मसिद्ध अधिकार आहे.”थरूर पुढे लिहितात, “घराणेशाही राजकारण भारतीय लोकशाहीसाठी एक गंभीर धोका आहे. जेव्हा राजकीय सत्ता कर्तृत्व, समर्पण किंवा जनसंपर्काऐवजी फक्त खानदानावर ठरते, तेव्हा प्रशासनाची गुणवत्ता घटते. कमी क्षमतेच्या गटातून नेते निवडणे हे कधीच फायदेशीर ठरत नाही, पण जेव्हा उमेदवाराची मुख्य पात्रता फक्त त्याचे आडनाव असते, तेव्हा परिस्थिती आणखी वाईट बनते.”

ते पुढे म्हणाले, “राजकीय घराण्यांचे सदस्य सामान्य जनतेच्या समस्यांपासून दूर राहतात. ते मतदारांच्या गरजांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यात बहुधा अपयशी ठरतात. आणि तरीसुद्धा, त्यांच्या खराब कामगिरीबद्दल त्यांना जबाबदार धरण्याची कोणतीही हमी नसते.”थरूर यांनी आपल्या लेखात जम्मू-काश्मीरमधील अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंब, ओडिशातील नवीन पटनायक, महाराष्ट्रातील ठाकरे बंधू, बिहारमधील पासवान आणि तेजस्वी यादव, पंजाबमधील बादल परिवार, तसेच तमिळनाडूमधील करुणानिधी परिवार यांचाही उल्लेख केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech