नवी दिल्ली : महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कांद्याच्या किमतीमध्ये स्थैर्य आणण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा थेट किरकोळ विक्रीला सुरुवात केली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या उपक्रमाचा सुरुवात करण्यात आली. सरकारच्या बफर स्टॉकमधील कांदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या नियंत्रित व लक्ष्यीत वितरण प्रक्रियेंतर्गत ही विक्री होणार आहे. किरकोळ विक्रीदरम्यान ग्राहकांना कांदा २४ रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध करून दिला जाणार आहे. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री सुरू करण्यात आली आहे. नाफेड आणि एनसी सोएफ यांच्या आउटलेट्स व मोबाईल व्हॅन्समार्फत कांदा विक्री होईल. नाफेड व एनसीसीएफच्या वितरण भागीदारांमार्फतदेखील कांदा उपलब्ध करून दिला जाईल.
सरकारने अद्याप नेमका कालावधी जाहीर केलेला नाही. मात्र, महागाई नियंत्रणात आणि बाजारातील दर स्थिर होईपर्यंत ही विक्री सुरू ठेवली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत. बफर स्टॉकमधील मोठ्या प्रमाणातील कांदा हळूहळू बाजारात सोडला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लाखो टन कांदा उप-लब्ध करून देण्याची तयारी आहे. मागणी आणि दर यांचा अभ्यास करून, दररोज व साप्ताहिक स्तरावर कांद्याचे प्रमाण बाजारात सोडले आहे. केंद्र सरकारच्या मते, थेट ग्राहकांपर्यंत स्वस्त कांदा पोहोचवल्यामुळे बाजारातील दर नियंत्रणात राहतील व अलीकडील महिन्यांमध्ये अन्न महागाईवाढीवर ब्रेक लागेल.