नवी दिल्ली : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार असून तिची चाचणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र, ही ट्रेन कोणत्या मार्गावर चालवली जाईल, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. वंदे भारत ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट् आहे. रेल्वे मंत्री म्हणाले की, वंदे भारत स्लीपर ट्रेन जोड्यांमध्ये चालवली जाते. त्यामुळे दुसरी ट्रेनही तयार केली जात आहे, जी १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. दोन्ही गाड्या तयार झाल्यावर योग्य मार्ग निवडून त्यावर ही सेवा सुरू केली जाईल. गेल्या काही काळात काही माध्यम अहवालांमध्ये असा दावा करण्यात येत होता की पहिली स्लीपर ट्रेन दिल्लीहून पाटणा किंवा दिल्लीहून बनारस दरम्यान चालवली जाईल. काही अहवालांमध्ये दिल्लीहून कोलकात्यादरम्यानही ही सेवा सुरू होईल, असा दावा करण्यात आला होता.
देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कुठे चालेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, सूत्रांनुसार, ही पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ऑक्टोबरच्या अखेरीस धावण्याची शक्यता आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे निर्माण बीईएमएल कंपनीने केले आहे. ट्रेनची बॉडी उच्च दर्जाच्या ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आली आहे, ज्यामुळे ती अधिक मजबूत आणि सुरक्षित आहे. ही ट्रेन ताशी १६० किमी वेगासाठी डिझाइन करण्यात आली आहे, आणि तिची चाचणी ताशी १८० किमी वेगाने करण्यात आली आहे. कोचचे अंतर्गत सजावट अत्यंत आकर्षक आणि आधुनिक आहे, ज्यामध्ये उत्कृष्ट लाईटिंग आणि सुंदर डिझाइन आहे. या ट्रेनमधील बर्थ्स राजधानी एक्सप्रेसपेक्षा अधिक आरामदायक ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. स्वयंचलित दरवाजे, टच-फ्री बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसारख्या सुविधा देखील यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.