रायगड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्रातील उरण येथे देशातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन झाले. हा क्षण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या टर्मिनलमुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात सर्वाधिक मालवाहतूक हाताळणारा राज्य म्हणून आपली अग्रगण्य भूमिका सिद्ध केली आहे. उम्मेद बाघ यांनी यावेळी सांगितल्याप्रमाणे, वाढवण बंदराच्या कार्यारंभानंतर भारत लवकरच जगातील टॉप १० बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या ऐतिहासिक प्रकल्पामुळे भारताची समुद्री अर्थव्यवस्था अधिक बळकट होणार असून महाराष्ट्र हे भारताचे मेरिटाईम सुपरपॉवर बनणार आहे. हा केवळ टर्मिनलचा उद्घाटन सोहळा नाही, तर भारताच्या समुद्री क्षमतेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठे परिवर्तन घडून आले आहे. मी स्वतः मुख्यमंत्री असताना या टर्मिनलचा पाया रचण्यात आला होता आणि आज उद्घाटनाचा साक्षीदार होण्याचा सन्मान लाभला, ही बाब माझ्यासाठी अत्यंत गौरवाची आहे. PSA आणि JNPT यांची भागीदारी ही विकासासाठी आदर्श ठरली असून, भविष्यात ही भागीदारी अधिक बळकट होईल, असा विश्वास आहे. दोन पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज झालेला हा ऐतिहासिक सोहळा भारताच्या मेरिटाईम भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल.