केदारनाथला जाणारी गर्दी नियंत्रणाबाहेर; पोलिसांकडून लाठीचार्ज

0

देहरादून : केदारनाथ धाम यात्रेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा थांबवण्याचे आदेश दिले असतानाही, बुधवारी (दि.१३) सोनप्रयागच्या सीतापूर येथे भाविकांनी पुढे जाण्याचा अट्टहास करत बॅरिकेड्स तोडले आणि आक्रमक झाले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांना भाविकांवर लाठीचार्ज करावा लागला. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे केदारनाथ यात्रेवर १४ ऑगस्टपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे.

गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी विविध ठिकाणी अडथळे आणि बॅरिअर्स लावण्यात आले आहेत. यामुळे सोनप्रयागमध्ये मोठ्या संख्येने भाविक अडकले आहेत. बुधवारी सकाळपासूनच भाविक पुढे जाण्याची परवानगी मागत होते. मात्र प्रशासनाने हवामानाच्या परिस्थितीकडे लक्ष वेधत यात्रा स्थगित केल्याचे सांगून त्यांना थांबवले. तास न तास वाट पाहून काही भाविकांचे संयम सुटू लागले आणि त्यांनी सोनप्रयागमध्ये लावलेले मुख्य बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी प्रतीक जैन यांनी सांगितले कि, देहरादूनमधील हवामान विज्ञान केंद्राने १२, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी रुद्रप्रयागसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने केदारनाथ यात्रा १२ ते १४ ऑगस्टदरम्यान तात्पुरती थांबवण्यात आली आहे. सोनप्रयागमध्ये दुपारपर्यंत गर्दीचा संयम सुटू लागला होता. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही भाविकांनी पोलीसांचे बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडू लागल्यावर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला. यानंतर भाविक चार दिशांनी पळू लागले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech