मुंबई : “ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचीती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शहर व उपनगरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर आयोजित दहीहंडी उत्सव प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित सैन्य दलातील जवानांना भेटून संवाद साधला. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आ. राम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,“दहीहंडी उत्सवाला उपस्थित असलेल्या सैन्य दलातील जवानांना व त्यांच्या शौर्याला मी मनःपूर्वक सलाम करतो. सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून घाटकोपर येथील उत्सवाने जे कार्य केले आहे ते उल्लेखनीय आहे. गोविंदा पथकांनी उभारलेले थर सैन्य दलाच्या शौर्यासाठी अर्पण केले आहेत, ही एक प्रेरणादायी बाब आहे.”
त्यांच्या हस्ते माजी सैन्य अधिकारी आनंद तिवारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्याबद्दल चेतन शाह व राजेश भीमसरे यांचा देखील गौरव करण्यात आला. मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिती विक्रोळी येथील टागोर नगरमध्ये आरंभ दहीहंडी कार्यक्रमास उपस्थित राहून मुख्यमंत्री म्हणाले, “दहीहंडी उत्सवात एकावर एक थर लावला जातो, तेव्हा हा संपूर्ण समाज एकत्रित असल्याचा महत्वपूर्ण संदेश दिला जातो. सर्वांनी एकसंघ राहून पुढे जाण्याचे हे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. यावेळी श्रुती विनोद घोगळे व सुहास माटे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.