नवी दिल्ली : बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधी यांचे रडगाणे सुरु आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. बिहारमध्ये पराभव निश्चित असल्याचा अंदाज आल्याने त्यांच रडगाणं सुरु आहे. ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा, मतांची चोरी अशा कथा रंगवून ते पार्श्वभूमी तयार करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी गांधी यांना लगावला. नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसंदर्भात गांधी यांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम बंद करावे, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात निवडणूक आयोगाचा गैरवापर आणि सर्वात मोठा घोटाळा झाला होता. तत्कालीन निवडणूक आयुक्त एम.एस गिल यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी रोखला होता. पुढे एम.एस गिल यांना काँग्रेसने मंत्रिपदाचे बक्षीस दिले हा सर्वात मोठा घोटाळा होता. त्यामुळे राहुल गांधींना महाराष्ट्रातील निवडणुकीवर आरोप करण्याचा अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खडसावले.
काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो, तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम यावर चोरीचा आळ घेणे हा राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. विरोधी पक्ष नेते पदावर असताना गांधी यांनी निवडणूक आयोगाचं, निवडणुकीच, मतांचे भान बाळगायला हवे. महाराष्ट्रातील निवडणुकीवर आरोप करणं हे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर सरासरी ७० मते वाढली तर एकूण आकडा ७० लाखांपर्यंत जातो. लाडकी बहिण योजना राज्यात जाहीर झाल्यानंतर सर्वांनीच महायुतीला विजयी करण्याचे ठरवले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. मात्र गांधी हे मान्य करायला तयार नाहीत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३१ जागांवर विजय मिळाला तर महायुतीला १७ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने मतांची चोरी केली असे म्हणायचे का, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला.