एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

0

सोनमर्ग : ऑपरेशन विजयचा २६ वा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सध्या कारगिल दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोनमर्ग येथे आपला ताफा थांबवून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. कारगिल मध्ये आयोजित सरहद शौर्यथॉन २०२५ या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते कारगिलमधील द्रास येथे उपस्थित राहणार आहेत. श्रीनगरहुन द्रासकडे जात असताना त्यांनी वाटेत उतरून त्यांनी येथील परिस्थिती स्थानिकांकडून जाणून घेतली. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सगळ्यात मोठा फटका हा काश्मीरमधील पर्यटनाला बसला होता. अशात शिंदे यांनी स्थानिक नागरिक, घोडेवाले, फळ विक्रेते इथे फिरायला आलेले पर्यटक यांच्याशी संवाद साधून येथील परिस्थिती विचारली.

यावेळी येथील दुकानदारांनी हळूहळू येथील परिस्थिती सामान्य होत असून पर्यटकांची पाऊले पुन्हा काश्मीरकडे वळू लागल्याचे सांगितले. तर इथे आलेल्या पर्यटकांनीही येथील वातावरण आता आम्हाला पूर्वीप्रमाणे सुरक्षित वाटत असून देशाचे हे नंदनवन पाहताना कोणतीही भीती वाटत नसल्याचे मत व्यक्त केले. यावेळी काश्मीरच्या थंडगार वातावरणात स्थानिक कणीस विक्रेत्याकडून कणीस विकत घेत शिंदे यांनी या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला. पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिकही आतंकवाद्यांशी सामील असल्याचा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या काश्मीर दौऱ्यात स्थानिकांशी संवाद साधत हा दुरावा कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यानिमित्ताने केलाय.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech