दिल्ली स्फोट : गृह मंत्रालयाकडे गोपनीय अहवाल

0

अनेक संशयितांना अटक, देशातील १२ राज्यांत अलर्ट

नवी दिल्ली : दिल्लीतील स्फोटानंतर गृह मंत्रालयाकडे एक गोपनीय अहवाल पोहोचला आहे. अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून १२ राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा जलदगतीने चौकशी करत आहेत आणि संशयितांकडून चौकशी सुरू आहे, जेणेकरून घटनेचा संपूर्ण तपशील मिळू शकेल. गृह मंत्रालयाच्या अहवालात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला. राजधानीतील गर्दीच्या भागात उभी असलेल्या आय-२० कारमध्ये झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी झाले. स्फोट इतका तीव्र होता की आसपासच्या दुकानांचे काचे फुटले आणि जवळ उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना आग लागली.घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिस घटनास्थळी पोहोचले. फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विझवण्यात आली. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी आणि मृतांना रुग्णालयात पोहोचवण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीत असे समोर आले की स्फोट एचआर २६ सीई- ७६७४ या क्रमांकाच्या कारमध्ये झाला होता, जी डॉ. उमर मोहम्मद चालवत होते. दिल्ली पोलिसांनी प्राथमिक चौकशी अहवाल गृह मंत्रालयाकडे सादर केला आहे. पोलिसांनी स्फोटात वापरलेल्या आय-२० कारच्या खरेदी-विक्रीचा आणि तिच्या संपूर्ण मार्गाचा मागोवा घेतला आहे.

स्फोटानंतर गृह मंत्री अमित शहा तातडीने एलएनजेपी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळालाही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. या घटनेनंतर लखनऊच्या डॉ. शाहीन शाहिद हिला अटक करण्यात आली आहे. शाहीन या अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. तसेच तिचे कश्मीरी डॉक्टर मुजम्मिल यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. मुजम्मिलला फरीदाबाद येथील भाड्याच्या २ खोल्यांमधून २९०० किलो स्फोटकांसह अटक करण्यात आली होती. डॉ. शाहीन शाहिद या व्यवसायाने डॉक्टर असली तरी सहकाऱ्यांना तिच्या खऱ्या कारवायांविषयी काहीच माहिती नव्हती. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, त्या भारतात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा स्थापन करण्यासाठी गुप्तपणे काम करत होती.

लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट घडवणारा डॉ. उमर मोहम्मद स्फोटाच्या तीन दिवस आधी फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातून सुट्टीवर गेला होता. तो शनिवारी घरी जाण्याचे सांगून निघाला, पण त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नाही. रविवारी जम्मू-कश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांच्या संयुक्त पथकाने डॉ. मुजम्मिलच्या खोलीतून ३६० किलो स्फोटक साहित्य आणि शस्त्रसाठा जप्त केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटाच्या चौकशीचे काम गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवले आहे. एडीजी विजय सखारे यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय एनआयएचे पथक तपास करणार आहे.

दिल्ली स्फोटानंतर देशभरातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून सुमारे १२ राज्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. अयोध्या, मथुरा, काशी यांसारख्या प्रमुख धार्मिक स्थळांसह महत्त्वाच्या संस्थांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.दिल्ली स्फोटानंतर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि इतर अनेक राज्यांत सुरक्षा दलांनी छापेमारी करून अनेक संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चौकशी करून स्फोटाशी संबंधित पुरावे गोळा केले जात आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावरून परतताच एलएनजेपी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech