पॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

0

मुंबई : वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉड टॅक्सी संदर्भात उपमुख्यमंत्री  शिंदे यांना सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरीक्त आयुक्त अश्विन मुदगल, पोलिस महानिरीक्षक अनिल कुंभारे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल म्हणून ‘पॉड टॅक्सी’ असून कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बीकेसी मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या भागात वर्दळ वाढणार असून या नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी चांगला पर्याय असणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. देशातील हा एकमेव प्रकल्प ठरणार असून त्याला मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावे आणि प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी, असेही शिंदे यांनी संगितले. पॉड टॅक्सीसाठी वांद्रे ते कुर्ला या ८ किमी अंतरामध्ये ३३ स्थानके आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर खासगी वाहनधारकांची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि पर्यायाने रस्त्यावरची वाहतूक देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech