नवी दिल्ली : डीजीसीएने एअर इंडियाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.केबिन क्रू आराम आणि कर्तव्य नियम, केबिन क्रू प्रशिक्षण नियम आणि ऑपरेशनल प्रक्रियांशी संबंधित विविध उल्लंघनांसाठी डीजीसीएने चार कारणे दाखवा नोटीसा जारी केल्या आहेत. एअरलाइनने काही स्वेच्छेने खुलासे केल्यानंतर एका महिन्यानंतर हे घडले आहे. एअरलाइनने २० आणि २१ जून रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला स्वेच्छेने केलेल्या खुलाशांच्या आधारे २३ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या एका वर्षात एअर इंडियाने काही स्वेच्छेने केलेल्या खुलाशांबद्दल आम्हाला नियामकांकडून सूचना मिळाल्या आहेत. आम्ही या सूचनांना निर्धारित वेळेत उत्तर देऊ. आम्ही आमच्या केबिन क्रू आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहोत.” डीजीसीएने एअर इंडियाला तीन ‘कारणे दाखवा नोटीस’ जारी केल्या आहेत. या नोटीसा क्रू ड्युटी आणि विश्रांती नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित आहेत. विशेषत हे चार लांब पल्ल्याच्या उड्डाणांशी संबंधित आहेत. त्यापैकी दोन २७ एप्रिल रोजी आणि प्रत्येकी एक २८ एप्रिल आणि २ मे रोजी चालवण्यात आली.
क्रू प्रशिक्षण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. ही नोटीस २६ जुलै २०२४, ९ ऑक्टोबर २०२४ आणि २२ एप्रिल २०२५ रोजी चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांशी संबंधित आहे. उड्डाण कर्तव्य,साप्ताहिक विश्रांती नियमाबाबत कारणे दाखवा नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. ज्या उड्डाणांसाठी नोटीस जारी करण्यात आली आहे ती २४ जून २०२४ आणि १३ जून २०२५ रोजी चालवली गेली होती. १२ जून रोजी लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एका इमारतीशी आदळले. या अपघातात एकूण २७९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एअर इंडिया एअरलाइन्स काही उल्लंघनांसाठी नियामक तपासणीच्या कक्षेत आली आहे.