नवी दिल्ली : विमानांच्या सुरक्षेवर देखरेख करणारी संस्था असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला एअर इंडियामध्ये अनेक प्रमुख त्रुटी आढळल्या आहेत.यामध्ये वैमानिक आणि केबिन क्रूच्या प्रशिक्षणातत्यांच्या विश्रांती आणि कर्तव्य नियमांमध्ये आणि टेक-ऑफ आणि लँडिंगशी संबंधित मानकांमध्ये सुमारे १०० प्रकारच्या त्रुटींचा समावेश आहे. १०० त्रुटींपैकी ७ त्रुटी ‘लेव्हल-१’ च्या आहेत. हे सर्वात गंभीर सुरक्षा धोके आहेत. आणि एअरलाइनला ३० जुलैपर्यंत त्या दुरुस्त कराव्या लागतील. उर्वरित ४४ त्रुटी २३ ऑगस्टपर्यंत दुरुस्त करण्यास सांगण्यात आले आहे. पण या त्रुटींची यादी अद्याप सार्वजनिक केलेली नाही. एअर इंडियाने एका निवेदनात हे ऑडिट निकाल स्वीकारले आहेत आणि ते निर्धारित वेळेत डीजीसीएला त्यांचे उत्तर देतील असे म्हटले आहे.
१ ते ४ जुलै दरम्यान गुरुग्राम येथील एअर इंडियाच्या मुख्य केंद्रावर एक मोठे ऑडिट करण्यात आले. यामध्ये फ्लाइट ऑपरेशन्स, वेळापत्रक, रोस्टरिंग आणि इतर अनेक पैलूंची तपासणी करण्यात आली. डीजीसीएने २३ जुलै रोजी एअर इंडियाला चार कारणे दाखवा नोटीस पाठवल्या होत्या. त्या केबिन क्रूच्या विश्रांती आणि कर्तव्य नियमांचे, प्रशिक्षण नियमांचे आणि ऑपरेशनल प्रक्रियेचे उल्लंघन करण्याबाबत होत्या.यापूर्वी २१ जून रोजी डीजीसीएने क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगसाठी जबाबदार असलेल्या तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. डीजीसीएला त्यांच्या कामाच्या शैलीत गंभीर निष्काळजीपणा आढळला होता.