धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला – अमित शाह

0

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे अनेक चर्चाना उधाण आले. आता या मुद्द्यावर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे आणि विरोधकांच्या “गायब असल्याच्या” दाव्यांना फेटाळून लावले आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत, अमित शहा म्हणाले की, “धनखड साहेबांचा राजीनामा स्वतःच स्पष्ट आहे. त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचे कारण वैयक्तिक आरोग्य सांगितले आहे. त्यांनी पंतप्रधान, मंत्रीमंडळातील सदस्य आणि सरकारच्या चांगल्या कार्यकाळाबद्दल मन:पूर्वक आभार मानले आहेत.”

विरोधकांकडून करण्यात आलेल्या “नजरकैद” असल्याच्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना शहा म्हणाले, “सत्य आणि असत्याची व्याख्या केवळ विरोधकांच्या विधानांवर आधारित असू नये. आपण या विषयावर अनावश्यक वाद आणि गोंधळ टाळावा. धनखड हे एक संवैधानिक पदावर होते आणि त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून आपली कर्तव्ये पार पाडली आहेत. त्यांनी आरोग्य कारणांमुळे राजीनामा दिला असून, या विषयावर फार विचारमंथन करण्याची गरज नाही.”

शहांचे हे वक्तव्य विरोधकांनी धनखड यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्यावर विचारलेले प्रश्न आणि आरोपांनंतर आले आहे. रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार बनवण्याबाबत अमित शाह म्हणाले कि, “त्यांनी सलवा जुडूमला फेटाळले आणि आदिवासींच्या आत्मरक्षणाच्या हक्कालाही नकार दिला. ह्याच कारणामुळे या देशात नक्षलवाद दोन दशकांपेक्षा अधिक काळ टिकून राहिला. माझा विश्वास आहे की, डाव्या विचारसरणीचा (विरोधी पक्षाने सुदर्शन रेड्डी यांना निवडण्यामागे) निकष राहिला असावा.”

दरम्यान, विरोधी नेत्यांचा दावा होता की, सरकारने धनखड यांना “गप्प बसवले” आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटले होते कि, “देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की एखाद्या उपराष्ट्रपतीने राजीनामा दिला आणि त्याच वेळी त्यांना गप्प करण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा होत आहे.” तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही धनखड यांना केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली. एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, “जुने उपराष्ट्रपती कुठे गेले? ते का लपून बसले आहेत. त्‍यांच्‍या राजीनाम्यामागे एक मोठी कहाणी आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech