नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर हा आपल्या लष्कराचा सन्मान आहे आणि तो देशासमोर मांडणे आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा मागितल्यानंतर आता विरोधकांनाच पश्चाताप होत असेल, असे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (५ ऑगस्ट) एनडीएच्या संसदीय गटाच्या बैठकीला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाले की, विपक्षातील नेते काहीही बोलतात आणि त्यामुळेच आता त्यांना सुप्रीम कोर्टाकडूनही झटका बसू लागला आहे. बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधींचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “ते काहीही बोलत राहतात. देशाने त्यांच्या वागणुकीतील बालिशपणा पाहिलेला आहे.”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “विरोधकांनी संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करून मोठी चूक केली आहे, त्यामुळे त्यांचीच फजिती झाली आहे.” पुढे ते म्हणाले, “असा विरोधक कुठे मिळेल, जो स्वतःच आपला पाय दगडावर आपटतो. विरोधकांनी अशा चर्चा दररोज घडवून आणाव्यात.हे आमचं क्षेत्र आहे, हे माझं क्षेत्र आहे आणि भगवान माझ्या सोबत आहे.” यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “लालकृष्ण अडवाणी यांच्या नंतर अमित शहा हे सर्वात जास्त काळ गृहमंत्री पदावर असलेले नेते आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे.”
एनडीएच्या संसदीय गटाच्या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात एनडीए संसदीय गटाने ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’ दरम्यान दाखवलेल्या भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला. त्याचबरोबर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांप्रती श्रद्धांजली आणि संवेदना व्यक्त करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानावर प्रतिक्रिया देताना सर्व खासदारांना आपल्या मतदारसंघात हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर, राष्ट्रीय क्रीडा दिन (२९ ऑगस्ट) आणि राष्ट्रीय अंतराळ दिन (२३ ऑगस्ट) हे सुद्धा आपल्या-आपल्या भागांमध्ये साजरे करण्याचे निर्देश खासदारांना दिले.