कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हंटली संघाची प्रार्थना

0

बेंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी गुरुवारी राज्याच्या विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना गायल्यामुळे राजकारण रंगात आले. त्यानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिन भाषणातील आरएसएसच्या उल्लेखावरून काँग्रेसच्या टीकेची खिल्ली उडवली. दरम्यान शिवकुमार यांनी मी जन्मतः काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहीन असे स्पष्टीकरण दिले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ७३ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री विधानसभेच्या आवारात “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे” ही संघाची प्रार्थना म्हणताना दिसत आहेत. ही घटना त्यावेळी समोर आली, जेव्हा भाजपने शिवकुमार यांच्या संघावरील मागील टिप्पणीवर टीका केली होती. भाजपने आज, शुक्रवारी काँग्रेसवर टीका करत म्हटले की आता काँग्रेसमधील बरेच नेते आरएसएसची प्रशंसा करत आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ट्विटर (एक्स) वर लिहिले की, “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे… डी.के. शिवकुमार यांनी काल कर्नाटक विधानसभेत आरएसएसची प्रार्थना गायली. राहुल गांधी आणि गांधी- वाड्रा कुटुंबीयांचे निकटवर्तीय आता आयसीयू/कोमा मोडमध्ये गेले आहेत.”

भंडारी यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्य दिन भाषणात संघाचा उल्लेख केल्याबद्दल काँग्रेसने केलेल्या टीकेवर उत्तर दिले आणि काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांकडे लक्ष वेधले. त्यांनी असा आरोप केला की, “काँग्रेसमध्ये कुणीही राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाच्या योगदानाचा उल्लेख केला, तेव्हा काँग्रेसने टीका केली होती. आता काँग्रेसमधील अनेक नेते संघाची स्तुती करत आहेत. काँग्रेसमध्ये शशी थरूरपासून डी.के. शिवकुमारपर्यंत – कोणीही राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही.”

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना शिवकुमार म्हणाले, “मी जन्मजात काँग्रेसचा आहे. एक नेता म्हणून मला माझ्या विरोधकांना आणि मित्रांनाही जाणून घ्यावे लागते. मी त्यांचा अभ्यास केला आहे. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी काँग्रेसचं नेतृत्व करीन. मी जन्मापासून मृत्यूपर्यंत काँग्रेसमध्येच राहीन.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech