“डॉक्टर असतानाही असह्य वेदनेने आत्महत्या, समाजातील ही सामूहिक अपयशाची वेळ – डॉ. नीलम गोऱ्हे”

0

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी उपसभापतींची भुमिका

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी आपल्या हातावर सुसाईड नोट स्वरूपात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप लिहिले असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त करत, यामागील सर्व सत्य शोधून काढण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “एका डॉक्टरने इतके टोकाचे पाऊल उचलणे हे अतिशय चिंताजनक आणि वेदनादायक आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांवरच असे गंभीर आरोप होणे, ही व्यवस्था हादरवणारी बाब आहे. साताऱ्याचे पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांनी याची सखोल चौकशी सुरू केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून यामध्ये आवश्यक ती काटेकोर चौकशी होईल अशी अपेक्षा आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “मृत्यूपूर्वी लिहिलेल्या मजकुराला न्यायालयात सत्यतेचा आधार मानला जातो. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक तपशील — फॉरेन्सिक अहवाल, कॉल रेकॉर्ड्स, संबंधितांच्या चौकशा यांचा निष्पक्ष तपास व्हावा. खरं तर, डॉक्टर हे समाजाचे आरोग्य जपणारे असतात; पण जेव्हा ते स्वतः अशा मानसिक वेदनेत अडकतात, तेव्हा हे समाजासाठीच आत्मपरीक्षणाचे कारण ठरते.”

महिला डॉक्टरांच्या आत्महत्येसारख्या घटनांबद्दल बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे या वेदनेची जाणीव मला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक महिला वैद्यकीय, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे अशा टोकाच्या पावलांपर्यंत गेल्या आहेत. पण मृत्यू हा कधीच पहिला पर्याय नसतो. समाजात समुपदेशन केंद्रे, महिला आयोग, महिला संघटना आणि मदत करणारी माणसं उपलब्ध आहेत. त्यांच्याशी संवाद साधा, मदत घ्या. लढा दिल्यास न्याय मिळतोच आणि आरोपींनाही शिक्षा होते.”

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाचा तपास तातडीने आणि निष्पक्षपणे व्हावा, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी मानसिक आरोग्य आणि महिला सुरक्षेच्या पायाभूत रचनांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचेही सांगितले प्रकरणातील आरोपी ला बडतर्फ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech