डॉक्टर तरुणी आत्महत्या : प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी, गोपाल बदने अद्याप फरार

0

सातारा : फलटण येथे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक केली आहे. त्याला फलटणच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर केले गेले. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली, तर आरोपीच्या वकिलांनी कमीत कमी कालावधीची कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या आदेशानुसार, बनकर २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांनी हा निर्णय दिला. दरम्यान दुसरा संशयित आरोपी गोपाल बदने अद्याप फरार आहे. त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर होते. त्यामुळे पोलिसांचे पथक तिथे रवाना झाल्याची माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आज पहाटेच्या सुमारास सातारा पोलिसांनी पुण्यातून प्रशांत बनकरला अटक करण्यात आली. फलटण पोलिसांनी या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर दोघेही फरार होते, मात्र अखेर प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते की, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने तिच्यावर अत्याचार केला आणि प्रशांत बनकर याने चार महिने मानसिक व शारीरिक छळ केला. यानंतर साऱ्या महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांनी प्रशांत बनकरला मुख्य आरोपी मानत त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

प्रशांत बनकरच्या घरातील वरच्या खोलीत मृत डॉक्टर तरुणीचे वास्तव्य होते. त्या रूमला पोलीसांनी सील केले आहे. बनकरच्या आई-वडिलांनी आणि भावाने सांगितले की, मुलाने डॉक्टर तरुणीला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी तपास सखोल करण्याची मागणी करत म्हटले की, सत्य समोर येईल आणि आरोप खोटे असल्याचे उघड होईल. त्यांच्या मते, डॉक्टर तरुणी एक वर्षापासून त्यांच्या घरात राहत होती आणि मुलाने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या घरांची झडती देखील घेतली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech