कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर वाळू तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सुरू केलेल्या तपासाअंतर्गत सोमवारी एकाच वेळी २२ ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई कोलकाता, झारग्राम आणि नदिया जिल्ह्यांमध्ये करण्यात आली. झारग्रामच्या गोपीबल्लभपूर येथे व्यापारी शेख जहिरूल अली यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान देखील उपस्थित होते. ईडीने सोमवारी सकाळपासूनच कोलकाता आणि परिसर, झारग्राम व नदिया जिल्ह्यांतील विविध ठिकाणी ही छापेमारी मोहीम सुरू केली. केंद्रीय सुरक्षा दलांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.मिळालेल्या माहितीनुसार, झारग्राम जिल्ह्यातील गोपीबल्लभपूरमध्ये शेख जहिरूल अली नावाच्या एका व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. तसेच कोलकातामधील बेहाला परिसरात एका कंपनीच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे. ही कंपनी बेकायदेशीर वाळू व्यापाराशी संबंधित असल्याचा संशय आहे.
सदर कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मोठ्या संख्येने केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की या संपूर्ण प्रकरणात झारग्राम जिल्ह्यातील शेख जहिरूल हा मुख्य सूत्रधार आहे. ईडीचे पथक त्याच्या सुवर्णरेखा नदीजवळील भव्य निवासस्थानी झडती घेत आहे.एक अधिकाऱ्याने सांगितले की, जहिरूलच्या घराची, कार्यालयाची तसेच त्याच्या वाहनांची झडती घेण्यात येत आहे. त्याच्यावर बेकायदेशीर वाळू उत्खनन व व्यापारात मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की त्याच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
तसेच झारग्राम जिल्ह्यातील बेलियाबेरिया आणि जाम्बोनी ब्लॉकमधील इतर वाळू खाणमालकांच्या मालमत्ता आणि कार्यालयांवरही छापेमारी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही संपूर्ण मोहीम बेकायदेशीर वाळू व्यापाराशी संबंधित आर्थिक जाळे उघडकीस आणण्यावर लक्ष केंद्रित करून राबवण्यात येत आहे. त्यांना असा संशय आहे की या रॅकेटमधून मिळालेला पैसा मोठ्या प्रमाणात विविध विमा कंपन्या आणि व्यावसायिक संस्थांमध्ये गुंतवण्यात आला आहे.