नवी दिल्ली : अवैध ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणाच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज गुगल आणि मेटा यांना नोटीस बजावल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांना २१ जुलै रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी सट्टेबाजीशी संबंधित अॅप्समधून कथितपणे झालेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत आहे आणि या संदर्भात गुगल व मेटा यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “गुगल आणि मेटा प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून या अवैध बेटिंग अॅप्सना जाहिरात दिली जात आहे आणि वापरकर्त्यांपर्यंत सहज पोहोच मिळवून दिली जात आहे.” त्यामुळे या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या भूमिकेची चौकशी होत आहे. धनशोधन प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) च्या संभाव्य उल्लंघनाच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईत एका मोठ्या बॉक्स ट्रेडिंग व ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणी चार ठिकाणी छापे टाकले होते, जिथे ३.३ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड, आलिशान घड्याळं, दागिने, परकीय चलन आणि आलिशान वाहनं जप्त करण्यात आली होती. या छाप्यांदरम्यान नगदी मोजण्यासाठी मशीनही सापडली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.