मुंबई : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानलेखक आणि विज्ञान प्रसारक प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. प्रा. नारळीकर हे जागतिक पातळीवर खगोलशास्त्रात आपल्या संशोधनामुळे ओळखले गेले. त्यांचे कार्य भारतासाठी महत्वाचे होते. मराठी मातीच्या या सुपुत्राने खगोलशास्त्रात मारलेली झेप निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानाची होती.
राज्य शासनाला देखील त्यांनी वेळोवेळी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं होतं. पुण्यात ‘आंतरविश्व विद्यापीठ’ स्थापना करून राज्यात विज्ञान संशोधनाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्राला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीचे स्थान प्राप्त झाले. त्यांचे निधन हे राज्यासाठी आणि देशासाठी मोठी हानी आहे. नव्या पिढीतील वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ हे निश्चितच डॉ नारळीकर यांची प्रेरणा घेत राहतील असा मला विश्वास आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात.