गुजरातच्या जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक लोक जखमी

0

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद येथे आज, शुक्रवारी जगन्नाथ स्वामींच्या रथयात्रेत सहभागी झालेले ३ हत्ती बिथरल्याची घटना घडली. यामध्ये गोंधळ उडाला आणि काही लोक जखमी झालेत. प्रशासनाने तत्परता दाखवत या हत्तींवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. यासंदर्भातील माहितीनुसार अहमदाबादच्या खाडिया परिसरातून आज, शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता रथयात्रा मार्गक्रमण करीत असताना रथयात्रेत सहभागी हत्तींपैकी ३ हत्ती बिथरले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक भाविक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी लोकांना लांब राहण्याचे आवाहन केले. माहूतांनी हत्तीचा पाठलाग केला आणि त्यांना नियंत्रणात आणले. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

पोलीस आणि स्वयंसेवकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हत्तींना आणखी चिथावणी मिळू नये म्हणून तात्काळ शिट्ट्या वाजवणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेपूर्वी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते पवित्र पहिंद विधी पार पाडल्यानंतर यात्रेला सुरूवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुटुंबासह जमालपूर जगन्नाथ मंदिरात मंगला आरतीमध्ये सहभागी झाले होते. या भव्य मिरवणुकीत १८ हत्ती, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे १०१ ट्रक, ३० आखाडे आणि १८ भजनी मंडळांचा समावेश होता. मात्र, या अनपेक्षित घटनेमुळे यात्रेला काही काळासाठी गालबोट लागले. सुदैवाने, प्रशासनाच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला आणि भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech