तिरुवनंपुरम : ब्रिटिश रॉयल नेव्हीचे एफ-३५बी लढाऊ विमान अखेर भारतातून रवाना होईल. पाच आठवड्यांपूर्वी तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केल्यानंतरहे लढाऊ विमान उद्या २२ जुलै रोजी उड्डाण करेल. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे या लढाऊ विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. आता या विमानातील बिघाड दुरुस्त करण्यात यश आलं आहे. आणि या विमानाला मंगळवारी उड्डाण करण्याची अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.
१४ जून रोजी ब्रिटनहून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या एफ-३५बी लढाऊ विमानात हायड्रॉलिक बिघाड झाला होता. त्यानंतर केरळमधील तिरुवनंतपुरम येथे त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पायलटला इंधनाची पातळी कमी असल्याने आणि प्रतिकूल हवामानामुळे त्रास सहन करावा लागला होता. त्याने केरळमधील जवळच्या योग्य विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा पर्याय निवडला आणि यासाठी भारतीय हवाई दलाने या विमानाला लँडिंगमध्ये मदत केली होती.
गेल्या पाच आठवड्यांतया लढाऊ विमानाला त्याच्या मूळ देशात म्हणजेच ब्रिटनमध्ये परत नेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. हे पाचव्या पिढीतील स्टील्थ फायटर जेट आहे. आणि ते ब्रिटनच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा भाग आहे. ते सध्या इंडो-पॅसिफिकमध्ये कार्यरत आहे. अलीकडेच भारतीय नौदलासोबत संयुक्त सागरी सराव पूर्ण केला आहे.६ जुलै रोजी अभियांत्रिकी समस्या आणि हायड्रॉलिक बिघाड दूर करण्यासाठी फायटर जेटला हलवण्यात आले. ब्रिटनमधील २४ जणांचा एक चमू, ब्रिटिश रॉयल एअर फोर्सचे १४ तांत्रिक तज्ज्ञ आणि १० क्रू मेंबर्स या लढाऊ विमानाच्या दुरुस्तीसाठी केरळला दाखल झाले होते.